x
Loading...

सुयोग्य पाण्याचा संतुलीत वापर हाच काँक्रिटचा प्राण:

घरबांधणीमधील पाण्याचा वापर हा अतिशय संयत प्रमाणात विशिष्ट प्रकारच्या निकषांनुसार असावा. त्यामुळे घरबांधणीमधील काँक्रिटला दीर्घायुष्ट मजबुती प्राप्त होते. पर्यायाने तुमचे घर सुंदर मजबूत होऊ शकते. काही झाले तरी त्या घरनिर्मितीमध्ये प्रत्येकाच्या भावना जशा गुंतलेल्या असतात, तसेच पैसेही मोठ्या प्रमाणात लागलेले असतात. तेव्हा पाण्यासारखा महत्त्वाचा घटक घरबांधणीमध्ये दुर्लक्षून चालणार नाही.

घरबांधणीमध्ये पाणी हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आजकाल काँक्रिटचा वापर घरबांधणीमध्ये सर्वत्र होत आहे. त्या काँक्रिटला मजबूतपणा देण्यासाठी पाण्याचा वापर कसा समतोलपणे आवश्यक त्या पद्धतीने करावा, हे लक्षात घेतले पाहिजे. अन्यथा पाण्याचा अतिरिक्त वापर या काँक्रिटच्या मजबुतीला मारक ठरू शकतो. यासाठीच पाण्याचा संयत वापर होणे त्याच प्रमाणे योग्य पाण्याचा वापर घरबांधणीच्या कामात होणे महत्त्वाचे आहे. ते प्रत्येकाने घर बांधताना लक्षात ठेवले पाहिजे.

काँक्रिटच्या सहाय्याने आज घरे बांधण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. त्यासाठी पाणीही लागत असते. परंतु आपल्या घर बांधण्याच्या ठिकाणी भरपूर पाणी आहे म्हणून ते वापरा काही कमी पडणार नाही, असे म्हणून चालत नाही. ते पाणी या कामासाठी योग्य आहे की नाही, ते प्रयोगशाळेतून तपासून घ्या. त्यानंतरच ते पाणी काँक्रिटमधील महत्त्वपूर्ण अशा प्रक्रियेसाठी हे पाणी वापरा. चांगल्या पाण्याने काँक्रिटची पकड घट्ट होऊ शकते.

काँक्रिटमध्ये पाणी तीन प्रकाराने काम करते. मुळात काँक्रिटमध्ये असणार्या सिमेंट, रेती खडी या घटकांना एकत्रित करण्याचे काम चांगल्या पद्धतीने ते मिश्रण तयार करण्याचे काम साध्य होते ते पाण्याने. काँक्रिटमध्ये पाणी तीन प्रकारांनी काम करत असते.

1) काँक्रिटमध्ये सिमेंटची पेस्ट तयार होते ती पाण्यामुळे ही पेस्ट त्या काँक्रिटमध्ये सर्वत्र पसरली जाते. काँक्रिटमधील सर्व घटकांना एकसंध करण्याचे काम ती पेस्ट करीत  असते.

2) सिमेंट पाण्याची रासायनिक प्रक्रिया होते. त्यामुळे सिमेंट घट्ट होते त्यामुळे काँक्रिटमध्ये ताकद निर्माण होते.

3) पाणी हे काँक्रिटमध्ये वंगणाचे काम करीत असते. त्यामुळे काँक्रिट सहजपणे पसरू शकते.

पाणी नेमके किती हवे, हा सर्वात महत्त्वाचा प्रश् असतो. काँक्रिट बनविण्याच्या कामात या पाण्याची आवश्यकता किती हवी ते लक्षात घेतले तितके पाणी वापरले गेले तर साहजिकच काँक्रिट चांगल्या प्रकारचे तयार होते, जे दीर्घकाळ टिकते. आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी वापरणेही चूक आहे. त्यामुळे काँक्रिटची ताकद वाढण्याऐवजी कमी होते. काँक्रिट तयार करताना मजूर हे मिश्रण सहजपणे पसरविण्याच्यासाठी पाण्याचा जास्त वापर करु शकतात, ते चुकीचे आहे. त्यामुळे या काँक्रिटची ताकत कमी होते. आवश्यकतेपेक्षा जास्त म्हणजे किती, ते विचार करता, साधारण पाच लीटर अधिक पाणी वापरले गेले तर काँक्रिटची ताकद दहा टक्क्यांनी कमी होते. यासाठीच काँक्रिटमध्ये पाण्याचा वापर हा अतिशय दक्षतेने सुयोग्यपणे व्हायला हवा.

पाणी कोणते वापरावे हे देखील महत्त्वाचे आहे. शरीराला जसे पिण्यायोग्य पाणी उपकारक ठरते, तसेच घरबांधणीच्या कामातही काँक्रिट तयार करण्यासाठी, सिमेंट वापरासाठी तयार करण्यासाठी वापरावे. खड्ड्यात साठलेले पाणी, समुद्राचे पाणी वापरू नये. पिण्यायोग्य पाणी जे आहे ते पाणी वापरणे केव्हाही चांगले. परंतु, तरीही त्या पाण्यामध्ये कोणते घटक आहेत, त्यांचा काही दुष्परिणाम काँक्रिट तयार करण्यावर वा पर्यायाने घरबांधणीमध्ये झाल्यास होणार आहे का, याची खात्री करणे गरजेचे आहे. एखादा बंगला वा घर बांधावयाचे झाल्यास सुमारे दोन ते तीन वर्षे लागतात. या कालावधीमध्ये पाणी वापरावयाचे असल्याने त्याचा स्रोत नेमका कुठून आहे, ते सुरुवातीपासूनच निश्चित करावे. पाणी एकाच ठिकाणाहून आणणार असाल, तर त्या ठिकाणच्या पाण्याची चाचणी करणे सोयीस्कर ठरते. मात्र या कालावधीत दोन तीन ठिकाणांहून पाणी आणावे लागणार असेल, तरीही ते तपासून घ्यावे. पाण्यामध्ये तेल, क्षार असे घटक असू नयेत. ते पिण्यास योग्य असावे, इतकी प्राथमिकता या पाण्याबाबत किमान पाहावीच. घनपदार्थांची मर्यादा सोबतच्या चौकटीत पाहावी.

बांधकामाच्या टिकावूपणासाठी पाण्यात क्लोराईड सल्फेट यांचे प्रमाण मर्यादित असावे.. थोडक्यात पाण्याची पीएच व्हॅल्यू 6 पेक्षा कमी नसावी.

IAS 456-2002 नुसार पाण्यातील घनपदार्थांची मर्यादा खाली दिली आहे.

घनपदार्थांची मर्यादा त्यांचे प्रमाण (मिलीग्रॅम प्रति ली.)

  1. ऑर्गनिक – 200
  2. इन ऑर्गनिक – 3000
  3. सल्फेट– 400
  4. क्लोराईड – 500
  5. सस्पेंन्डेड नॅट. – 2000

टीप गेल्या गृहरचनेमधील लेखात पाण्याच्या संजीवनीबद्दल काहीशी प्राथमिक माहिती दिली होती. त्याचाच पुढील भाग या लेखात देत आहोत.