x
Loading...
ACE-Designs-Blog4

बांधकामाच्या दर्जासाठी हवी तत्परता:

बांधकामामध्ये दर्जाचे नियंत्रण महत्त्वाचे आहे. वापरीत असलेल्या काँक्रिटचा दर्जा तपासणे, पाण्याची चाचणी करणे, लोखंड प्रमाणकानुसार वापरणे गरजेचे आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी तत्परता घेतली गेली तर भक्कम टिकावू बांधकामाची निर्मिती होऊ शकेल.

टिकावू भक्कम बांधकाम या सुरक्षितता नामक नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोन्ही बाजू भक्कम हव्यात, त्यामुळे सुरक्षिततेचे नाणे खणखणीत राहाते. सर्वसाधारणपणे इमारतीच्या आराखड्यावर, बाह्यस्वरुपावर अंतर्गत रचनेवर लक्ष दिले जाते. मात्र तितके पुरेसे नाही, घर टिकावू बांधण्यावर जोर देणे अतिशय आवश्यक आहे. बांधकाम करतानाच केले जाणारे बांधकाम जितक्या अपेक्षित कालावधीसाठी टिकेल, असे बांधले पाहिजे. त्यामध्ये होणारे काही र्हास वा नुकसान, कसे होऊ शकते, याचा परिपूर्ण विचार केल्याशिवाय टिकावूपण त्या घराला लाभत नाही. या घटकांचा विचार करून त्याच्या टिकावूपणावर विचार करणे गरजेचे आहे

एकंदर बांधकामाच्या 40 टक्के खर्च हा त्याच्या सांगाड्यावरचा म्हणजे फ्रेमवर्कवरील असतो. आरसीसीची ही फ्रेम वा सांगाडा असतो. या खर्चामध्ये बिल्डर वा घरमालक यांना बचत अपेक्षित नसते. पण योग्य बांधकाम पद्धत माहिती नसल्याने किंवा कंत्राटदार अननुभवी असल्याने किंवा घरबांधकामासाठी योग्य पद्धत अवलंबल्याने इमारतीचे बांधकाम नित्कृष्ट दर्जाचे होते.

तयार घर घेणार्यांना ते बांधकाम मजबूत टिकावू असे द्यायला हवे. तशी जबाबदारी बिल्डर, मालक, अभियंते वा कंत्राटदार यांची निश्चितपणे असते. ती नाकारता येणार नाही. यासाठीच यांची निवड करताना अतिशय दक्षपणे करायला हवी.

कंत्राटदार घर वा बांधकामासाठी प्रत्यक्ष कार्याची अंमलबजावणी बांधकाम जागेवर करणारा कंत्राटदार हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. तो स्वस्त तो मस्त हा निकष यासाठी लावणे योग्य नाही. तो काम कसे करतो, त्याची कामाची पद्धत काय आहे, त्याला कामामधील अनुभव कसा आहे, आदी विविध बाजू पहाणे हे महत्त्वाचे आहे. त्याची कामासाठी असणारी मजुरी स्वस्त आहे ना, मग बरे, असे म्हणून आपण आपल्या बांधकामाच्या कामासाठी त्याला नेमण्याचा निकष ठरवू नये. कामाची व्याप्ती किती आहे, त्याच्या कामाचा आवाका कसा आहे, त्याला कामामधील ज्ञान अनुभव किती आहे, हे पाहणा गरजेचे आहे. कोणी त्याचे नाव सुचविले, त्याचे नाव प्रसिद्ध आहे अशा निकषावरही कंत्राटदाराची निवड करू नये. कंत्राटदार हा अनुभवी, उत्त्म दर्जाचे काम करणारा असला पाहिजे. सध्या एकंदर कामांची व्याप्ती पाहाता, चांगले काम करणार्या कंत्राटदारांची संख्या तशी अतिशय कमी आहे.

सुपरवायझर बांधकामावर देखरेख करण्यासाठी सुपरवायझर हा घटक अतिशय गरजेचा असतो. काहीवेळा इंजिनिअर वा अभियंता उपलब्ध असतो असे नाही. सातत्याने बांधकामाच्या ठिकाणी भेट देणे सर्व अभियंत्यांना शक्य असतेच असे नाही. त्यामुळे सुपरवायझर या घटकाला त्या अनुषंगाने प्रशिक्षित करून त्यांना त्या कामासाठी कार्यकुशल बनविणे, गरजेचे आहे. अर्थात सुपरवायझर म्हणजे अधिकृत अभियंता नव्हे हे देखील खरे आहे. मात्र त्याला कार्यकुशल बनविल्यास बांधकामांमध्ये चांगल्यापैकी सुधारणा होऊ शकतील. किमान कौशल्यावर आधारित शिक्षण देणारी तशी संस्था तयार करण्याची गरज आहे. सुपरवायझर स्तरावरील व्यक्तींना कुशलतेसाठी देण्यात येणार्

या प्रशिक्षणामध्ये केवळ थिअरि नव्हे तर व्यावहारिक ज्ञानही कार्यशाळा आयोजित करून देता येऊ शकेल.

आज बांधकामक्षेत्रामध्ये कार्यकुशल कामगारांच्या निर्मितीचीही अतिशय गरज आहे. त्या बांधकामाच्या सुरक्षिततेवर, टिकावूपणावर तर हा उद्योग अधिक चांगल्या पद्धतीने उभारला जाऊ शकेल, हे महत्त्वाचे.

बांधकाम उद्योगामध्ये अनेक प्रकारचे साधनसामग्रीचे प्रकार, स्तर आढळून येतात. त्याबाबत वैशिष्ट्ये लक्षात घेतली गेली तर दोष योग्यवेळी दूर होऊ शकतो. म्हणूनच अशा प्रकारच्या कुशल कारागीरांच्या निर्मितीची गरज आहे.

बांधकाम साहित्य यामध्ये रेती, लोखंड आदी घटक येतात. उपलब्ध असलेल्या रेतीमध्ये चिखल वा माती नसावी. त्यामध्ये असणार्

या क्लोराईडमुळे काँक्रिटमधील लोखंडी सळ्यांना गंज चढतो, तसेच सर्वसाधारण रेतीमध्ये मर्यादेपेक्षा जास्त क्लोराईड क्षाराचे प्रमाण असेल तर ते योग्य नाही. वाळू ओली असल्यास काँक्रिटमध्ये वापरण्यात येणार्

या पाण्याचे प्रमाण कमी असणे गरजेचे आहे. पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास काँक्रिटची ताकद कमी होत असते.

लोखंड बीआयएस प्रमाणित असणे प्राधान्याने पाहावे. ज्यामुळे त्या लोखंडाची योग्य जाडी वजन यांची खात्री मिळते

पाणी काँक्रिटमध्ये पाणी हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. सिमेंटबरोबर त्याची रासायनिक प्रक्रिया होते. रेतीप्रमाणेच पाण्यातही क्लोराईड वा क्षाराचे प्रमाण असेल तर काँक्रिटमधील स्टील (लोखंड) गंजण्याची प्रक्रिया लवकर सुरू होेते.खारट वा समुद्राचे पाणी क्राँक्रिटसाठी वापरू नये. पाण्याचे परिक्षण करून घेणे आवश्यक आहे. क्युरिंगसाठी (काँक्रिटचा पृष्ठभाग ओला ठेवण्यासाठी) पाणी गरजेचे आहे. एकंदर बांधकामसाठी पाणी कसे वापरावे, हे सांगायचे झाल्यास प्राथमिकदृष्ट्या अशा पिण्यास योग्य असेच पाणी वापरावे, असेच साधारणपणे सांगावे लागेल.

सिमेंट ब्लेंडेड पोर्टलॅण्ड सिमेंट असे दोन प्रकारचे सिमेंट आज उपलब्ध आहे. सध्या ब्लेंडेड सिमेंट प्रामुख्याने वापरले जाते. या सिमेंटचा वापर करताना पूर्वीच्या कार्यप्रक्रियेऐवजी येथे दहा टक्के पाणी कमी वापरावे त्यामुळे काँक्रिटची ताकद वाढते

दर्जाचे नियंत्रण बांधकामाच्या दर्जाचे नियंत्रण महत्त्वाचे आहे. वापरीत असलेल्या काँक्रिटचा दर्जा तपसणे गरजेचे आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी बांधकामामध्ये घेता येईल. ठराविक अंतराने काँक्रिट क्यूब टेस्ट करून घेणे आदी बाबी यामध्ये येतील. काँक्रिटमध्ये सिमेंट पाणी यांचे गुणोत्तर प्रमाण कमी करून ठेवल्यास काँक्रिट अधिक मजबूत होते. सिमेंटच्या एका बॅगसाठी  सुमारे 25 लीटर पाणी आवश्यक असते.त्यात पाच लीटर पाणी जरी अधिक वापरले तरी त्यामुळे मजबुतीमध्ये 10 टक्के घट होत असते. हे सारे सांगण्याचे कारण यासाठी की त्यावर लक्ष ठेवून दर्जा उंचावता येऊ शकतो. पाण्याची चाचणीही करणे गरजेचे आहे

यामध्ये एक साधा नियम आहे. एक साधा काँक्रिटद्वारे तयार केलेला काँक्रिटमिश्रणाचा चेंडू ( तयार केल्यावर लगेच ) हवेत एक मीटरपर्यंत वर फेकला तर तो फुटता कामा नये जर तो फुटला तर त्यात पाण्याचे प्रमाण जास्त झाले आहे से समजावे.

भूकंपरोधक बांधकाम भूकंपरोधक आहे असे अनेकजण सांगत असतात ते म्हणजे नेमके काय, ते पुढील लेखात पाहू. अलिबाग हे भूकंपप्रवण क्षेत्राच्या प्रवर्गात येत असून भूकंपरोधक बांधकाम करण्यासाठी आयएस 13920 च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ते बांधणे आवश्यक आहे. यासाठी साहित्याचा काही वेगळा खर्च येतो का, असा प्रश् पडू शकतो. पण त्यासाठी कोणताही अधिक खर्च येत नाही हे ध्यानात ठेवावे. हे काम म्हणजे काम करणार्या माणसाच्या कौशल्याचा ज्ञानाचा भाग यावर अवलंबून असणारा घटक आहे. यासाठी कंत्राटदाराला प्रशिक्षित करणे अतिशय गरजेचे आहे. हे प्रशिक्षण म्हणजे काही मोठा खर्चाचा भाग आहे, असेही नाही.

देखभाल   दुरूस्ती  बांधकामानंतर त्या इमारतीचे आयुष्य वाढावे, ते निरोगी राहावे यासाठी देखभाल ही अतिशय महत्त्वाची कृती आहे. त्यासाठी बांधकामाची वरच्यावर देखभाल करणे, दुरूस्ती करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे. आधुनिक पद्धतींचा अवलंब करणे, दर 4 ते 5 वर्षांनी इमारतीला रंग लावणे, त्यासाठी जलप्रतिबंधक रंगाला प्राधान्य देणे. इतक्या काही गोष्टी ध्यानात ठेवल्या तरी भरपूर झाले….