x
Loading...
ACE-Designs-Blog2

घराला जीवन देणारे पाणी :

घर बांधताना आणखी एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे पाणी. पाणी हे जीवन मानले जाते, ते केवळ सजीव वस्तूंच्यासाठीच नव्हे तर घरासारख्या निर्जीव अशा रचनेसाठीसुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. पाण्याच्या विशिष्ट पद्धतीने केलेल्या वापरामुळे, पाण्याच्याही आवश्यक अशा गुणामुळे तुमचे घर तयार होत असते. बांधले जात असते. त्यामध्ये वापरण्यात येणार्या सिमेंट, रेती या विविध घटकांना एकजीव करण्याचे, मजबूत करण्याचे सामर्थ्य या पाण्यात आहे. दुसर्या शब्दात सांगायचे तर पाणी हे त्या घराला सजीवच करीत असते.

सुरक्षितपणा टिकावूपणा हा घराला घर बांधण्यापासूनच प्रदान करावा लागत असतो. तो देणारे कोणी वेगळे नसतात. आपणच असतो. केवळ पैसा पुरविला वा नामांकित कंत्राटदार नेमला वा प्रसिद्ध वास्तुरचनाकाराकडून आरेखन करून घेतले म्हणजे काम झाले, असे नाही. तर वास्तुरचनाकार अभियंत्याने सुचविलेले मुद्दे, केलेल्या शिफारशी या नीटपणे अंमलात आणल्या जात आहेत की नाही, ते पाहाणेही गरजेचे असते. गेल्यावेळी याच अनुषंगाने विषयाला हात घालण्यापूर्वी सर्वसाधारण प्राथमिक माहिती दिली होती. आता यावेळी घराला मजबूत घरपण देणार्या काही घटकांविषयी पाहू.

घर बांधताना सर्वात महत्त्वाची बाब असते ती म्हणजे जमीन. अजूनतरी जमीनवरच आपण राहात आहोत. अंतराळात घर करण्याची स्वप्ने प्रत्यक्षात आलेली नाहीत. हे जेव्हा केव्हा प्रत्यक्षात येईल, तेव्हाही त्याचे सूत्रबद्ध नियोजनपूर्ण काम करावे लागेल. जमीन हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, जमिनीवर घर बांधण्यासाठी जमिनीखालची रचनाही पाहाणे अतिशय महत्त्वाचे असते. जमीन कशी आहे, ते लक्षात घेतल्याशिवाय घराचा पाया घालता येत नाही. यासाठीच जमिनीच्या अंतर्गत भाग कोणत्या रचनेचा आहे, तेथे दगड आहे की पाणी आहे. सागरकिनार्यापासून किती जवळचा भाग आहे, त्यामुळे जमिनीमध्ये क्षारस्वरूप घटक आहेत ते किती प्रमाणामध्ये परिणाम वा दुष्परिणाम करणारे असतील, डोंगर असेल तर त्या जमिनीखालील भागही पक्क्या पद्धतीच्या भूरचनेचा आहे की नाही, आदी विविध बाबी पाहाणे हे गरजेचे आहे. जमिनीचा शेतीसाठी जसा पोत बघितला जातो, तसाच प्रकार घरबांधणीसाठीही पाहावा लागतो. ज्या जमिनीवर तुम्ही घर बांधणार आहात, ती जागा अशा विविध पद्धतीने तपासून घेणे हे नक्की महत्त्वाचे ठरते. कारण त्यावरच त्या घराची मजबुतीही अवलंबून असते

जमिनीप्रमाणेच घरबांधण्यासाठी पाया घालतानाही कोणत्या प्रकारे पाया घालायचा आहे हे निश्चित केल्यानंतर या घरबांधणीसाठी कोणत्या प्रकारचे साहित्य वापरणार आहात, त्या साहित्याचा, सामग्रीचा दर्जा कसा असेल, त्याची गोदामाची जागा कशी असेल तसेच ते नीट सुरक्षितपणे राहून काही वातावरणाच्या दुष्परिणामाने खराब होणार नाही ना, याचीही काळजी घेणे गरजेचे असते. त्या त्या सामग्रीचे महत्त्व हे त्या दर्जावर जसे अवलंबून असते तसे त्या सामग्रीच्या वापरण्यावरही अवलंबून असते. घर बांधताना आणखी एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे पाणी. पाणी हे जीवन मानले जाते, ते केवळ सजीव वस्तूंच्यासाठीच नव्हे तर घरासारख्या निर्जीव अशा रचनेसाठीसुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. पाण्याच्या विशिष्ट पद्धतीने केलेल्या वापरामुळे, पाण्याच्याही आवश्यक अशा गुणामुळे तुमचे घर तयार होत असते. बांधले जात असते. त्यामध्ये वापरण्यात येणार् सिमेंट, रेती या विविध घटकांना एकजीव करण्याचे, मजबूत करण्याचे सामर्थ्य या पाण्यात आहे. दुसर्या शब्दात सांगायचे तर पाणी हे त्या घराला सजीवच करीत असते. ज्या पाण्याचा वापर घरबांधताना अतिशय मोलाचा असतो, अशा पाण्याचा दर्जाही त्या कामासाठी किती महत्त्वाचा असेल, हे यावरूनच लक्षात येईल.

आज अनेक प्रकारच्या प्रयोगशाळांमधील चाचण्यांनी घरबांधणी साहित्याचा दर्जा तपासता येतो. केवळ नवे नव्हे तर जुने घर दुरूस्त करतानाही अशा चाचण्यांचा वापर होत असतो, केला जात असतो. त्यामुळे अनेक प्रकारचे गुणावगुण समोर येत असतात त्यातूनच पर्यायही शोधले जात असतात. घराच्या संरचनेच्यादृष्टीने म्हणूनच तयार होत असलेल्या पाया, पोल, बीम, विटा, लोखंड या सार्यांचा विचार करावा लागतो. तुमच्या शरीराला काही झाल्यास नेमके निदान व्हावे म्हणून आज पॅथॉलॉजीचा जसा वापर वैद्यकीय क्षेत्रात केला जातो, त्यामुळे तुमच्या शरीराला काय योग्य आहार, औषधे हवी आहेत, ते समजून येते, तसेच या घरबांधणीसाठी लागणार्या विविध सामग्रींबाबत तसेच घराच्या मूळ संरचनेच्यादृष्टीने विज्ञानाचा वापर करून अशा प्रकारच्या प्रयोगशाळांमधील चाचण्याचा वापर करणे महत्त्वाचे आहे. पूर्वापार चालत आलेल्या अनेक शास्त्रांमधील गैरसमजांना छेद मिळून त्या शास्त्रातील खर्या अर्थाला समजून घेण्याचे काम या प्रयोगांमधूनच सिद्ध होत असते. यामुळे घराच्या घरपणाला अधिक मजबुती येत असते. पाणी हे जीवन म्हणूनच म्हटले असावे, त्यातून तुमच्या घरबांधणीच्या कामात त्याचा जो वापर तुम्ही करता, त्यातूनच घराची भविष्यातील मजबुती, टिकावूपण साकार होणार आहे.

घरबांधणीसाठी काँक्रिट निर्मितीमध्ये सिमेंटसारख्या महत्त्वाच्या घटकामध्ये जे पाणी वापरणार आहात, त्यामुळे काही परिणाम होणार आहे का, हे त्या पाण्याच्या चाचणीमुळेच समजून येऊ शकते. पाण्यामध्ये जर क्षार असतील किंवा क्लोराईड असेल तर सळईस्टील गंजण्याची प्रक्रिया अतिशय लवकर सुरू होते, खारट अथवा समुद्राचे पाणी घरबांधणीमध्ये वापरू नये. थोडक्यात पाण्याचा पोत कसा आहे, हे समजून घेऊन मगच ते पाणी वापरले पाहिजे. एक प्रकारे घर बांधताना त्या घराला सजीवत्त्वच देत असतो, अशावेळी त्याला त्या पाण्याच्या आवश्यक दर्जानुसार पाणी द्यायला नको का, हे पाहाणे म्हणूनच गरजेचे आहे. काँक्रिट तयार करणे असो किंवा काम झाल्यानंतर त्यावर पाणी मारणे वा पाण्यामध्ये तो भाग ठेवणे गरजेचे असते. हे पाणी त्यावर परिणाम करते. तो परिणाम ठरावा, दुष्परिणाम ठरू नये. यासाठीच घरबांधणीमधील पाणी वापरताना तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, पाण्याचे परीक्षण करून वापरावे.

 त्याचप्रमाणे त्याचा वापर करताना आज किती पाणी वापरले जाते, ते ही महत्त्वाचे आहे. सिमेंटला गरजेनुसार पाणी मिळाले पाहिजे पण याचा अर्थ रेती, सिमेंट मिश्रणामध्ये ते अवाच्यासवा वापरणे म्हणजे चांगले, असाही होत नाही. थोडक्यात पाणी हे जीवन म्हणून सजीवाला जसे महत्त्वाचे आहे, तसेच ते घरबांधणीमध्येही घराला सजीवत्त्व आणण्याच्या कामात जीवनदायी, असेच आहे, हे पक्के लक्षात ठेवायला हवे. घरबांधणीच्या संजीवनी बुटीमध्ये असणार्या अन्य घटकांबाबत पुढील लेखामध्ये माहिती घेऊ.